धारणगाव खडक येथील भोंदू बाबा महेशगिरीच्या अडचणीत वाढ ; जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला ; मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महेश साळुंके /लासलगाव
निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे स्वतःला महाराज म्हणवून घेत दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१) याचा जामीन अर्ज सोमवार दि.११ मे रोजी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, तपासावर होणारा संभाव्य परिणाम तसेच पुढे आणखी तक्रारदार समोर येण्याची शक्यता लक्षात घेत प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. के. आर. जोगळेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यामुळे महेशगिरीचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
एक २८ वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक तणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेतून जात असताना तिच्या पालकांनी तिला धारणगाव खडक येथील तथाकथित ‘प्रतिगाणगापूर’ मठात नेले होते. तेथे महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी, करणीबाधा व धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले. आरोपीने पीडित महिलेला ‘करणीबाधा’ असल्याचे सांगून विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक घेऊन अश्लील व वैयक्तिक संदेश पाठवण्यास सुरुवात केली. “तू मला आवडतेस”, “लग्न करू नकोस, माझा मठ चालव” अशा प्रकारचे संदेश आरोपीकडून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे.
दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपीने महिलेला नाशिक येथे बोलावून त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे “माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू विरोध करू शकणार नाहीस” अशी भीती दाखवत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच विवस्त्र छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने मोबाईलमधील पुरावे डिलीट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आरोपीच्या प्रभावामुळे व भीतीपोटी पीडित महिला बराच काळ तक्रार देण्यास धजावत नव्हती. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्यानंतर अखेर तिने लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. सुक्रे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता मनोज तोरणे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीतर्फे ॲड. योगेश तिडके यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दि. २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर महेशगिरी याची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
दरम्यान, आरोपीच्या वतीने ॲड. प्रभाकर रणशूर यांनी भारतीय न्याय संहिता कलम ४८३ अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवार दि.११ मे रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे नाशिक जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता रामनाथ शिंदे यांनी जामिनास तीव्र विरोध दर्शवत हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तपास अधिकारी तथा लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासातील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो तसेच या प्रकरणात आणखी महिलांची फसवणूक अथवा शोषण झाल्याच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवत जामीन अर्ज फेटाळून लावला. सध्या आरोपी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





